
उद्यापासून ५ दिवस मयुरेश्वर मोरगाव येथे माघी यात्रा उत्सव होणार संपन्न
Monday, January 31, 2022
Edit
मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील माघी यात्रा उत्सव उद्या मंगळवार दि. १ ते शनिवार दि ५ या काळात संपन्न होणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी भक्तांना माघ शुद्ध प्रतीपदा ते शुद्ध पंचमी पर्यंत श्रींच्या मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस जलस्नान घालण्याची पर्वनी साधता येते. मात्र कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भक्तांना मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेता येणार नाही मात्र मुर्ती गाभाऱ्याबाहेरुन नियमित दर्शन भक्तांना घेता येणार आहे. याबाबत प्रशासना मार्फत सुचना दिल्यानुसार हा निर्णय घेतला असल्याची माहीती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार व सरपंच निलेश केदारी यांनी दिली.
मोरगाव ता. बारामती येथील माघी यात्रा उत्सव उद्या दि. १ पासुन सुरु होत आहे. उत्सवा निमित्ताने उद्या मयुरेश्वरास हिरे, माणिक मोती युक्त सुवर्णालंकार चढविले जाणार आहेत. दरवर्षी माघ शुद्ध प्रतीपदा ते माघ शुद्ध पंचमी या काळात सर्व धर्मीयांना मुख्य मुर्ती गाभाऱ्यात जाऊन स्वहस्ते मयुरेश्वरास जलस्नान घालता येते. मात्र कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जलस्नान घालता येणार नसल्याच्या सुचना प्रशासना मार्फत आज वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पिएसआय शेख यांनी दिल्या.
मंदिराच्या चार दिशांना चार द्वार असून द्वार मंदिर ठिकाणी अनवाणी चालत जाऊन दुर्वा वाहण्याची विशीष्ट अशी प्रथा येथे प्रचलीत आहे . तिथीचा क्षय आल्यामुळे बुधवार दि २ पासून ते शुक्रवार दि . ४ पर्यंत केवळ तीन दिवस येथील द्वार यात्रा संपन्न होणार आहे .उत्सवानिमित्त दि ३ रोजी मोरया गोसावी प्राप्त मंगलमुर्ती पालखी सोहळा चिंचवड येथून मोरगाव येथे सायं ७ वाजता येणार आहे . सालाबादप्रमाणे चालत आलेले सर्व नियोजित धार्मिक विधी व कार्यक्रम संपन्न होणार आहेत असून भक्तांना बाहेरुन नियमित दर्शनासाठी मंदिर सुरुच राहणार असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .