आजचा युवक आणि सिंधुताई सपकाळ यांचे कार्य
Wednesday, January 19, 2022
Edit
'सुख पाहता जवाएवढे
दुःख पर्वताएवढे'
या म्हणीप्रमाणे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या होत्या. आज सिंधुताई सपकाळ जरी पडद्याच्या मागे गेल्या असल्या, तरी त्यांच्या कार्य कीर्ती रुपाने उरले आहे. आज समाजामध्ये शेकडो तरुण आहेत. जसा सिंधुताई सपकाळ यांना समाजाबद्दल वाटणारा कळवळा दिसून येतो असा कळवळा समाजामधील तरुणांमध्ये निर्माण व्हावा. यासाठी सिंधुताई सपकाळ यांचा संघर्ष समजावून घेणे आवश्यक वाटते.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी पिंपरी मेघे तालुका जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव चिंधी अभिमान साठे हे होते. शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले. लहानपणी खेळण्या-बागडण्याच्या ऐवजी म्हशी राखण्याचे काम चिंधीला करावे लागत. शिक्षणाची आवड लहानपणापासूनच होती आपल्या मुलीने खूप शिकावे अशी वडिलांची इच्छा होती. त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्यामुळे इच्छा असूनही चिंधीला पुढचे शिक्षण घेता आले नाही. रूढी परंपरा यांचा विचार करून आई-वडिलांनी चिंधीचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी नवरगाव फॉरेस्ट येथील श्रीहरी सपकाळ यांच्याशी केला खेळण्या - बागडण्याऐवजी संसाराचे ओझे त्यांच्या खांद्यावर पडले. त्यामुळे बालपणाला पूर्णविरामच लागला.
सासरी गेल्यावर चिंधी ला शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागला. चिंधीचे वय लहान असल्यामुळे घरात कोणीच समजून घेतले नाही. उलट घरातील लोक वेगवेगळ्या कारणांनी त्यांचा छळ करीत होते. घरामध्ये त्या शुद्ध भाषा बोलत. या गोष्टीचा सर्वांना राग येत. पतिला वाटत ही आपल्यापेक्षा वेगळी चार पुस्तके वाचलेली आहे,म्हणून पती लाथा बुक्या घालत.
त्यांना वाचनाची आवड असल्याने पुस्तके कागदे उंदीर, घुशींच्या बिळात लपून ठेवत .सासरी हे सगळे दुःख सहन करत असताना त्यांनी गवळी बांधवांसाठी शेणखताविरुद्ध खूप मोठा लढा दिला. त्यामुळे पतीने त्यांना घरातून हाकलून दिले.
पुढे शिक्षणाचे माहेरघर पुणे असल्याने आपल्या मुलीने पुण्यामध्ये शिक्षण घ्यावे ह्या हेतूने अमरावती सोडून पुण्यामध्ये दाखल झाल्या. ताई रस्त्याने फिरत असताना बालगंधर्व नाट्य मंदिरासमोर येऊन थांबतात नाट्यमंदिरात भारत-रशिया मैत्री करार चालू होता. त्या ठिकाणी कडक पहारा होता. त्यावेळी त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की, आपणही आत मध्ये जावे . शिपाई त्यांना आत जाऊ देत नव्हता त्यावेळी त्यांना समोर झाशीच्या राणीचा पुतळा दिसला. झाशीच्या राणीने इंग्रजांच्या मनामध्ये दहशत निर्माण केली होती. आपण एवढे करू शकत नाही का? हीच प्रेरणा घेऊन त्यांनी आतमध्ये प्रवेश मिळवला आणि भाषणाला सुरुवात केली.
*"मंजिल बहुत दूर है |
जाना वहा जरूर है |
रास्ता मुश्किल है |
मरणा मंजूर हे" ||*
या शेरमुळे त्यांना प्रसिद्धी मिळत गेली पुढेही त्यांनी सामाजिक कार्य सुरू ठेवले. पुण्यामधील पहिला अनाथ मुलगा दिपक गायकवाड चा त्यांनी सांभाळ केला. प्रभा डाके अशीच अनाथ मुलगी त्यांनी संभाळली त्यांचे पालन पोषण केले या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी रस्त्यावर गाणी म्हटली. मंदिरासमोर भजन म्हटले, भाषणे दिली. अशी एकेक करता करता अशी हजारो अनाथ मुले दाखल झाली. त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार एकुण 750 मिळाले आहेत. एवढे महान कार्य केले आणि त्याची पोच पावती म्हणून भारतातील मानाचा पद्मश्री पुरस्कार त्यांनी मिळवला. आज त्या 36 सुना 282 जावई आणि हजारो अनाथ मुलांच्या आई आहेत.
आजच्या तरुणांना मला एवढेच सांगायचे आहे की, सिंधुताईंनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाचा विरोध पत्कारून सामाजिक कार्य केले. काहीही नसताना सिंधुताईंनी एवढे यश मिळवले म्हणून आजच्या तरुणांनी सिंधुताईंचे सारखे कार्य हाती घेतले, तर समाज्यामध्ये बालगुन्हेगारी अनाथाआश्रमे कमी होतील.
अलीकडच्या काळातील तरुण पिढीही विज्ञान-तंत्रज्ञानाशी जोडली गेली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचा त्यांच्या मानसिकतेवर भयानक परिणाम दिसून येतो यामुळेच त्यांच्यातील संवेदना कमी होताना दिसत आहे. म्हणूनच अलीकडील तरुण पिढी ही दाम्पत्य जीवन जगत असताना कुटुंबांमधील आई - वडील, आजी- आजोबा, बहिण-भाऊ, नातेवाईक यांच्याशी संवाद कमी होताना दिसत आहे. याच तंत्रज्ञानामुळे तरुण-तरुणींचे वैवाहिक जीवन, संसार उद्ध्वस्त होत आहे. कित्येक संसार तुटत चालले आहेत. कुटुंबव्यवस्था ढासळताना दिसते.आजही समाजात पुरूषप्रधान संस्कृतीत,
स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते. आपण बातम्यांमध्ये पाहतो हुंड्यासाठी खून केला जातो. अपूर्ण शिक्षण असतानाच तिच्यावर लग्नाचे जोखड लादले जाते. हे आजही आपण उघड्या डोळ्यांनी समाजामध्ये पाहत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि हे सर्व तरुण पिढीच्या हातात आहे. तरुणांमधील संवेदना जागृत करण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. सिंधुताईंनी आपल्या भारताची संस्कृती सोडली नाही. अमेरिका - इंग्लंडमध्ये गेले असतानाही नऊवारी साडी परिधान केली होती. म्हणजेच सिंधुताईंना आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला नव्हता पण आजच्या तरुणांना या संस्कृतीचा विसर पडलेला दिसून येतो. समाजामध्ये लहान मुलं सिगारेट तंबाखू गुटखा या व्यसनाधीनते कडे वळली आहेत.तरुण मुले या प्रसारमाध्यमांमध्ये अडकून बसली आहे. स्वतःचे अस्तित्व धोक्यात येत आहे, याची पुसटशी कल्पनाही डोक्यात येत नाही. सिंधुताईंनी अनेक अनाथ मुलांना मायेची पखरण घातली. आजच्या तरुणांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे आयुष्यामध्ये कितीही दुःख आले, तरी जीवन जगायचे सोडू नये. सिंधुताई सपकाळ स्वतः म्हणत '' मी फक्त जगायचे ठरवले, जगते आणि जगणार आहे. '' हीच जगण्याची कला आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे. सिंधुताई सारखा आदर्श आपण मनामध्ये ठेवून त्यांचे कार्य पुढे नेले पाहिजे.
चि. प्रितम रामदास गुळूमकर T.Y.Bsc chem. (राष्ट्रीय सेवा योजना) तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती