-->
बारामती: कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा - अजित पवार

बारामती: कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा - अजित पवार

  बारामती :-  कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करा,  अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. बारामती परिसरात सुरू असणारी विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे  निर्देशही त्यांनी दिले.


बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, पुणे सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार विजय पाटील,  गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशासनाने कोरोना नियमांची अंमलबजावणी कडकपणे करावी.  बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नसावा.  सर्वच नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे त्यासाठी यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यावा, असे निर्देश  देऊन त्यांनी नागरिकांनी मुखपट्टीचा (मास्क) वापर करावा, योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही केले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, बारामती नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव आदी मान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article