
बारामतीच्या केसरी टूर्सच्या कार्यालयातील कर्मचारी महिलेवर चाकू हल्ला; हल्ला करणारा cctv मध्ये कैद
Tuesday, January 18, 2022
Edit
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) याठिकाणी आज सकाळी एक थरारक घटना समोर आली आहे. याठिकाणी पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या एका महिलेवर ऑफिसमध्ये घुसून चाकू हल्ला (Knife attack on woman) करण्यात आला आहे. आरोपी तरुणाने संबंधित महिलेच्या हातावर वार केले आहेत. या हल्ल्यात पीडित महिला जखमी झाली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV footage) झाली असून सोशल मीडियावर वेगानं व्हायरल (Viral video) होतं आहे. या घटनेची माहिती बारामती शहर पोलिसांना देण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना बारामती शहरातील नीरा डावा कालवाशेजारी असणाऱ्या पूर्वा कॉर्नर कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. याठिकाणी केसरी टूर्सचं ऑफिस आहे. याच ऑफिसमध्ये फिर्यादी महिला पर्यटनाचं बुकिंग करण्याचं काम करते. दरम्यान आज सकाळी एका अज्ञात तरुणाने ऑफिसमध्ये शिरून पर्यटनाचं बुकिंग करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित महिला जखमी झाली आहे.
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास केसरी रजत टूर्सचं ऑफिस उघडल्यानंतर, आरोपी तरुण याठिकाणी आला होता. त्याने 'मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. तुम्ही लवकर ऑफिस बंद केलं', असं म्हणत फिर्यादी महिलेच्या गळ्यात हात घातला. आरोपी तरुण गळ्यातील सोन्याची साखळी ओढतोय की काय? असं वाटल्यानं संबंधित महिलेनं आरोपीचा हात धरला. यानंतर आरोपीनं 'माझा हात सोड' म्हणत महिलेवर चाकुने वार केले. यानंतर फिर्यादी महिलेनं त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला.