
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद
कवठे/वाई - केंजळ (ता.वाई) येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात शुक्रवारी (ता. ११) मध्यरात्री अज्ञातांनी चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केला.
विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharj Statue) बसविल्याने पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त असून, शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. पुतळा ग्रामस्थ व युवकांनी काढून घ्यावा व प्रशासनाची परवानगी घेऊन बसवावा. यावर प्रशासन ठाम असताना पुतळा हटविण्यास गावातील ग्रामस्थ आणि युवकांचा विरोध असल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणात शुक्रवारी (ता. ११) मध्यरात्री अज्ञातांनी चबुतरा बांधून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केला. ही माहिती सकाळी समजल्यानंतर भुईंज पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने प्रशासन दाखल झाले असून, गावात परिसरात तणावाचे वातावरण आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी गावात दाखल झाले आहेत.
प्रशासन पुतळा हटविण्यावर ठाम असून, पुतळा हटविण्यास गावाचा विरोध आहे. पोलिस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तहसीलदार रणजित भोसले, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे आदी अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू आहे. मध्यरात्री पुतळा गावच्या भैरवनाथ मंदिराच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला दर्शनी भागात बसविण्यात आला. ही माहिती मिळताच पोलिस व महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांना याबाबत कळविण्यात आले आहे. ज्यांनी पुतळा बसविला त्यांनी तो ताबडतोब हटवावा, असे ग्रामस्थांना सूचित करण्यात आले आहे. याबाबत कोणी पुढाकार घेत नसल्याने गावात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, प्रतापगड उत्सव समितीच्या नियंत्रक श्रीमती विजयाताई भोसले, सचिन घाडगे, विवेक भोसले व शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी गावात भेट देऊन पुतळा काढू नये, यासाठी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, त्यावर काही मार्ग निघाला नाही.