
बारामती: दंडवडी येथील पाणीपुरवठा योजनेची लोखंडी पाईप चोरणारी टोळी जेरबंद; ४.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती तालुक्यातील दंडवाडी ग्रामपंचायत पाटस हद्दीतून हनुमान पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेलेल्या लोखंडी पाईपचे साहित्य एका छोटा टेम्पोत चोरी करून जाणारी टोळीला पाटस पोलिसांनी जेरबंद केले आहे.
मोसिम रफिक भाई तांबोळी (राहणार पाटस), सचिन प्रकाश चव्हाण, पिंटू संभाजी शितोळे, शुभम लक्ष्मण खंडाळे, अमोल बाळु चव्हाण, अक्षय ज्ञानदेव चव्हाण (सर्व रा. कुसेगाव ता.दौंड, जि.पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून, चारजण पसार झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस (ठोंबरे वस्ती, लोखंडी पूल) ते दंडवाडी (ता. बारामती) येथील हनुमान पाणीपुरवठा योजनेंतर्गत शेती व पिण्याच्या पाण्यासाठी 10 इंच लोखंडी पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. सध्या ही पाणीपुरवठा पाईपलाईन बंद आहे. 19 फेब्रुवारीला पाटस हद्दीतून लोखंडी वाय सॉकेट स्प्रिंग व इतर साहित्य चोरी करून टेम्पोत कुसेगाव येथील पोईच्या घाटाजवळ चोरून नेताना ग्रामस्थांनी पकडला.
यावेळी दोन चोरांना पकडले तर इतर चारजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. याबाबत पाटस पोलीसांना माहिती मिळताच पाटस पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत साडेचार लाखांचा मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले.