
जनतेच्या कराच्या पैशातून इमारती उभ्या राहतात, त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो, त्यामुळे इमारतीत प्रामाणिकपणे काम करावं व त्याच करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी - उपमुख्यमंत्री अजित पवार
Sunday, February 20, 2022
Edit
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या हस्ते बारामती पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या माध्यमातून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करावा,असं आवाहन यावेळी केलं.
शासकीय इमारती जनतेनं दिलेल्या कराच्या पैशातून उभ्या राहतात, त्याला जनतेच्या घामाचा सुगंध असतो. त्यामुळे इमारतीत काम करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावं आणि इथे येणाऱ्या व्यक्तीच्या करातून आपल्याला पगार मिळतो याची जाणीव ठेवावी. काम करताना लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करण्याची आवश्यकता आहे. विकासाची कामं करताना गोरगरीबांनाही त्याचा उपयोग होईल याची दक्षता घेण्यात येईल. पंचायत समितीच्या इमारतीत बँकेसह इतरही सुविधा देण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीतून दूरदृष्य प्रणालीची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाज गतिमान होण्यास मदत होईल.
ही इमारत राज्य आणि देशातील पंचायत समितीची भव्य इमारत असावी. इमारतीच्या माध्यमातून चांगलं काम उभं रहावं. पंचायत समितीच्या कामकाजाचं वेगळं महत्त्व आहे. लोकप्रतिनिधींनी पंचायत समितीच्या माध्यमातून चांगलं कार्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यामुळे महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था रुजली. याच माध्यमातून सत्ता सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम झालं. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याची ही परंपरा यशस्वी झाली. लोकशाही व्यवस्थेचं बळकटीकरण होऊन लोकशाही मजबूत झाली.
बारामती शहरात अनेक कार्यालये,वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुंदर इमारती उभ्या झाल्या आहेत. कवी मोरोपंतांच्या स्मारकाचं काम अंतिम टप्प्यात आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, बाजार समितीची सुविधायुक्त वास्तू, अद्ययावत क्रीडा संकुल, पाणी पुरवठा योजना या सुविधा जनतेसाठी निर्माण करण्यात येत आहेत.
बारामती बसस्थानकाचं काम पूर्ण होत आहे. हे बसस्थानक राज्यातील प्रमुख स्थानकांत गणलं जाईल. बारामती हे शिक्षणाचे ‘हब’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास मला आहे. पाणी पुरवठ्याच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा दूर करण्यात येईल.