
वडगांव निंबाळकरमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून १.५ लाखांची सोन्याची साखळी केली लंपास
Thursday, February 17, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर पोलिस असल्याची बतावणी करत ज्येष्ठाकडील सोनसाखळी हातचलाखीने लांबविल्याची घटना गुरुवारी (दि. १७) घडली. या घटनेत दीड लाख रुपयांची तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी अज्ञाताने लंपास केली.
सावता नामदेव हिरवे (वय ६६, रा. वडगाव निंबाळकर) यांची या घटनेत फसवणूक झाली. गुरुवारी दुपारी ते वडगाव निंबाळकर - कोऱ्हाळे खुर्द रस्त्यावर गावातील बनकर यांच्या घराशेजारी असताना डोक्यावर टोपी, अंगावर खाकी रंगाची पॅंट परिधान करत एक व्यक्ति दुचाकीवरून तेथे आला. त्याने स्वतः पोलिस असल्याची बतावणी केली. त्यांच्याकडील तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी काढून ठेवण्यास सांगत हातचलाखीने ती लंपास केली आणि वडगाव बाजूने सुसाट निघून गेला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी फिर्याद केली असून पुढील तपास पो.हवा फणसे करीत आहेत.