
सोमेश्वर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजी काकडे यांच्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Thursday, February 24, 2022
Edit
कोऱ्हाळे बु- भाचींचे नावे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात असलेल्या शेअर्सची परस्पर विक्री करत त्याची रक्कम स्वतःसाठी वापरल्या प्रकरणी व बहिणीच्या नावे असलेल्या ८.५ एकर जमिनीचे बनावट असाईन्मेंट डीड करत जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शहाजीराव मुगुटराव काकडे यांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्यांचे भाचे अभिजित बापूसाहेब देशमुख (रा. कळंबवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर, सध्या रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) यांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संगीता बापूसाहेब देशमुख (ऐश्वर्या उर्फ संगीता महेंद्रसिंह जाधवराव), मनिषा बापूसाहेब देशमुख (मनिषा राजेंद्र शिंदे) व अनिता बापूसाहेब देशमुख (अनिता प्रमोद बर्गे) या फिर्यादीच्या बहिणी आहेत. या तिघींच्या नावे सोमेश्वर कारखान्याचे शेअर्स होते. त्यापैकी मनिषा व अनिता यांच्या नावे असलेल्या शेअर्सपैकी प्रत्येकी पाच हजार रुपयांचे एका शेअर्सची रक्कम त्यांचे बॅंकेत खाते असताना ते नसल्याचे भासवून, प्रशासनातील अधिकाऱ्यांशी असलेल्या हितसंबंधाचा वापर करून काकडे यांनी रोख स्वरुपात पैसे घेतले. दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी तीनही बहिणींच्या नावे असलेल्या इतर शेअर्समधून असाच अपहार करण्यात आला. फिर्यादीचे आजोबा कै. मुगुटराव साहेबराव काकडे यांनी साडे आठ एकर जमिनी खरेदी करत ती १९६५ साली फिर्यादीच्या आईच्या नावे स्वखुशीने केली होती. त्या जमिनीचा जुना गट क्रमांक १७१ तर नवीन गट क्रमांक १६७ आहे. त्या जमिनीबाबत बारामती दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट असाईन्मेंट डीड करून दस्त क्रमांक ९३० अन्वये फिर्यादीच्या आईच्या परस्पर ही जमिन परस्पर इतरांना विकून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करण्यात आली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
‘यामध्ये माझा काहीच दोष नाही. हे सर्व गलिच्छ राजकारण - शहाजीराव काकडे