
निरा नदी खोऱ्यातील सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमात गडबड; उशिरा ऊस तुटल्याने एकरी १५ हजारांचे नुकसान
Sunday, February 13, 2022
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - बारामती तालुक्यातील नीरा नदी पट्ट्यातील साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कार्यक्रमात मोठी गडबड असल्याची माहिती वडगाव निंबाळकरचे प्रगतशील बागायतदार शशिकांत शहा यांनी दिली.
नीरा नदी पट्ट्यात सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती सहकारी साखर कारखाने आहेत तिनही कारखाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असल्याने कारखाना निवडणुकीत ऊस उत्पादक सभासद राष्ट्रवादी देईल त्या उमेदवाराला डोळे झाकून मतदान करतो.
ज्यावेळी ऊसाची लागण होते तेव्हा ऊस उत्पादक सभासद ऊसाची नोंद कारखान्याच्या शेतकी विभागाकडे करतो.
कारखान्याच्या शेतकी विभागाचे चिटबॉय व वरिष्ठ प्लॉटवर न जाता नोंदी धरतात.
उदा. ऊस लागण नोंद 2 एकर, प्रत्यक्षात 1.5 एकर त्यातील चाऱ्यासाठी व बेण्यासाठी अर्धा एकर ऊस संपवला जातो. तोडणीच्या वेळी मात्र स्वतःचा 1 एकर व शेजारच्या 1 एकर तोडला जातो त्यामुळे अनेक सभासदांवर अन्याय होतो. प्रत्येक शेतकऱ्याला शेजारच्या ऊसाची लागण नोंद माहित असते. यावर्षी ऊसाचे जास्त क्षेत्र असल्याने ऊस वेळेवर तुटत नाही. ऊस तोडणीला आल्याने ऊसाला तुरे आलेले आहेत तेही झडून गेल्याने टनेज घटत असल्याने ऊस उत्पादक सभासद ऊस कारखान्याला जाण्यासाठी काळजीत आहेत.
कारखान्याचे कर्मचारी नियमांवर बोट ठेवत आहेत. यावर्षी उशिरा तुटणाऱ्या ऊसाचे एकरी सरासरी 4 ते 5 टनाचा शेतकऱ्यांना भुर्दंड बसणार आहे. यासाठी साखर कारखान्याने कारखान्याचे वेळेत विस्तारीकरण करणे गरजेचे होते. त्यास सभासदांचा विरोध नव्हता केवळ विरोधी गटाच्या नेत्यांचे ऐकून विस्तारीकरण केले नाही. ज्यावेळी राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असते, त्यावेळी ऊसाचे उत्पादन कमी असते. त्यावेळी ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कारखान्याचे पदाधिकारी बेने देवू, खते देवू, भाव चांगला देवू, अनुदान देवू असे घसा ओरडून सांगतात आणि ऊसाचे क्षेत्र वाढल्यावर कारखान्याचे अधिकारी व पदाधिकारी भामट्यासारखे गप्प बसतात. अशा पदाधिकाऱ्यांना ओल्या ऊसाने फटके द्यावेत का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. यावर लवकरात लवकर साखर आयुक्तांनी लक्ष घालावे असे शहा यांनी सांगितले.