
बारामतीतील या २ रस्त्यांना मिळाला तब्बल ८०० कोटींचा निधी; महाराष्ट्र संबंधित 2100 कोटींपर्यंतचे रस्ते प्रकल्प केले मंजूर
Sunday, March 20, 2022
Edit
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे. त्यांनी महाराष्ट्राशी संबंधित 2100 कोटींपर्यंतचे रस्ते प्रकल्प मंजूर केले आहेत.
याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. या मंजूर कामांमध्ये बारामती, परभणी, नांदेड व गडचिरोली या महामार्गांच्या कामांचा समावेश आहे. गडकरींनी एकामागून एक ट्विट करत कोणत्या रस्त्याच्या प्रकल्पासाठी किती कोटींचा निधी मंजूर झाला आहे, याची माहिती दिली आहे.
याआधी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एका चर्चेला उत्तर देताना नितीन गडकरींनी, भारतामधील रस्त्यांचे जाळे आणि संबंधित पायाभूत सुविधा 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीचे करण्याचे केंद्र सरकारने केले असल्याचे सांगितले होते.
महाराष्ट्रातील NH-160 च्या उंडेवाडी कडे पठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण या 33.65 किमी रस्त्याचे 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 778.18 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.
NH-752H च्या चिखली - दाभाडी - तळेगांव - पाल फाटा या 37.360 किमी रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 350.75 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे. NH-161A च्या मुदखेड ते नांदेड विभागातील नांदेड - भोकर - हिमायतनगर - किनवट तसेच माहूर - अरणी रोड या रस्त्याचे 2-लेन तसेच 4-लेनमध्ये (पेव्ह्ड शोल्डरसहित) पुनर्वसन व अपग्रेडेशन करण्यासाठी रु. 206.54 कोटींसह मंजूरी देण्यात आली आहे.