
माळेगाव येथे दिवसा घरफोडी करणारा अखेर अटक; १० लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत
Sunday, March 6, 2022
Edit
बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे मागील महिन्यात भरदिवसा झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांसह दागिने विकत घेणाऱ्यालाही अटक केली आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली.
युवराज अर्जून ढोणे, भाऊ अविनाश अर्जूने ढोणे (रा. मिरजगाव खेतमाळस वस्ती, ता. कर्जत, जि. नगर) या चाेरट्यांसह निलेश कुंदणमल झाडमुथा (रा. डोंगरगण, ता. आष्टी, जि. बीड) या दागिने विकत घेणाऱ्याला पाेलिसांनी जेरबंद केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील झगडे काॅम्प्लेक्समध्ये दि. २२ फेब्रुवारी रोजी दिवसा चाेरी झाली हाेती. यात चाेरट्यांनी विनोद दत्तात्रय चांडवले यांची बंद सदनिका फोडत १७ तोळे दागिन्यांसह ८ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नाेंदवण्यात आला होता. याचा तपास सहायक निरीक्षक राहूल घुगे, हवालदार राम कानगुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवाजी ननावरे यांच्या पथकाने केला. त्यानुसार ढोणे बंधू आणि झाडमुथा याला ताब्यात घेत मुद्देमालही जप्त केला.
आरोपी अविनाश ढोणे याने झाडमुथा याला दागिने विकल्यानंतर आलेल्या पैशातून ॲपल-१२ हा फोन आणि नवीन बजाज प्लॅटीना दुचाकी खरेदी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यातील तिघांनाही १० मार्चपर्यंत बारामती न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
युवराज ढोणे याने यापूर्वीही चोऱ्या केल्या आहेत
बारामती तालुका पोलीस ठाण्यात २०१९ साली दाखल गुन्ह्यात युवराज ढोणे हा फरार हाेता. बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोन, सोलापूरला विजापूरनाका, सोलापूर शहर, जोबावी पेठ, बार्शी शहर, पंढरपूर आणि पुण्यात दिघी, स्वारगेट, हडपसर आदी ठिकाणी १३ गुन्हे दाखल आहेत.