
पनवेल अधिवेशनात घोषणांचा पाऊस; शिक्षक संघाच्या मागण्यांसाठी शरद पवारांचा पुढाकार
Friday, March 18, 2022
Edit
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पनवेल येथे आज पार पडले,या अधिवेशनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या अनेक मागण्यांवर घोषणा केल्या अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली
संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन कर्नाळा स्पोर्ट क्लब पनवेल येथे संपन्न झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी अध्यक्ष सुनील तटकरे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे,निलेश लंके, उमेश पाटील ,संभाजीराव थोरात यांच्यासह राज्यसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुनी पेन्शन हा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे, राजस्थान छत्तीसगड या राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करता येते का याबाबत गंभीरपणे चिंतन करून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले,
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकल,पती-पत्नी,विस्थापित शिक्षकांच्या सोयीसाठी बदली धोरणात आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी संभाजीराव थोरात यांच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, मुख्यालय राहण्याबाबतचा शासन निर्णय बदलण्यात येईल मात्र शिक्षकांनी शालेय कामकाजात वेळेवर उपस्थित राहावे अशी अपेक्षा ग्रामीण विकास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली. १०-२०-३० ही आश्वासित योजना लागू करण्यासाठी अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशीही घोषणा हसन मुश्रीफ यांनी केली, २००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीमधील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगातील पदवीधर व मुख्याध्यापकांचे वेतन त्रुटीसाठी बक्षी समितीचा खंड २ लवकर प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,संगणक परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात येईल व वसुली केलेली वेतनवाढीची रक्कम परत देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, कॅशलेस विमा योजना सुरू करण्यात येईल तसेच केंद्रप्रमुखांची पदे शिक्षकांमधून भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले .
यावेळी बोलताना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीसांगितले की हसन मुश्रीफांच्या शिक्षक हिताच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाठिंबा दिला जाईल,
यावेळी सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे यांचा शिक्षक संघांमध्ये प्रवेश जयंत पाटील व संभाजीराव थोरात यांच्या शुभ हस्ते घेण्यात आला, प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष अंबादास वाझे यांनी तर स्वागत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी केले,आभार प्रदेश सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी मानले