
सायंबाचीवाडी येथील स्वयंभूनगर सोसायटी निवडणुकीत डी.पी.जगताप यांच्या पॅनेलचा धुरळा
Tuesday, April 5, 2022
Edit
लोणी भापकर :- बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथील स्वयंभूनगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत सोमेश्वर कारखान्याचे संचालक व बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती डी. पी. जगताप यांच्या पॅनेलचा १३-० ने धुराळा झाला आहे.
पुणे महानगरपालिकेचे युवा नगरसेवक दुर्योधन भापकर यांच्या श्री शिव स्वयंभू परिवर्तन सहकारी पॅनेलच्या पतंगाने गगनभरारी घेतल्याने पॅनेलच्या सर्व जागांवर उमेदवारांनी बाजी मारत निवडणुकीत एकहाती विजय मिळवला.
संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रोजी मतदान झाले. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारावर संस्थेचे 75 टक्के सभासद नाराज होते. सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी दुर्योधन भापकर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेल उभे केले होते. या पॅनेलला सायंबाचीवाडीसह लोणीभापकर येथील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी व संस्थेच्या सभासदांनी मोठा पाठिंबा जाहीर केल्याने श्री शिव स्वयंभू परिवर्तन सहकारी पॅनेलने 13-0 असा मोठा विजय मिळवला.
सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पॅनेलच्या तेराही उमेदवारांच्या पतंग चिन्हावर शिक्का मारून पॅनेलला मतदान करावे असे अवाहन सर्व उमेदवारांच्या वतीने दुर्योधन भापकर यांनी केले होते त्या अवाहनाला सभासदांनी प्रतिसाद दिल्याने पॅनेलचे १३ उमेदवार विजयी झाले.
निकालानंतर कार्यकर्त्यांनी व प्रचार प्रमुखांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली.