
विकास कामासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही पण विकास कामाचा दर्जा ढासळला तर थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोऱ्हाळे बु :- कोऱ्हाळे खुर्द गावाच्या विकासासाठी ९ कोटी ६४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विकासासाठी मिळणाऱ्या निधीतून गावाचा सर्वांगिण विकास करण्याचे आवाहन त्यांनी केले. कामाचा दर्जा ढासळला तर थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, कामे चांगली दर्जाची करा. मी येणार म्हणून डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला. कामाच्या दर्जात आम्ही हयगय सहन करणार नाही. कामात हयगय झाली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असं ते म्हणाले.
बारामती तालुक्यातील मौजे कोऱ्हाळे खुर्द येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सरपंच गोरख खोमणे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, बारामतीच्या गाडीखेल गावाच्या परिसरात वन विभागाच्या जागेत वाघ आणि सिंह सफारी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होतील. अष्टविनायकसाठी शासनाने ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होण्यास मदत होवून भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील.
बारामती येथील राजीव गांधी सायन्स अँड इनोव्हेशन सेंटर मध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि प्रयोगशाळा उपलब्ध आहे. खेड्यातील मुलांनी शाळेच्या माध्यमातून या केंद्राला भेट द्यावी, जेणेकरून त्यांच्या ज्ञानात भर पडेल. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे.
बारामती नीरा रस्ता चार पदरी करण्यात येणार आहे, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. यंदा ऊसाचे पीक चांगले आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांचाच सहभाग आवश्यक असतो. ग्रामपंचायतीने लोकाभिमुख पारदर्शक कारभार करावा, गोरगरीब लोकांना घरकुलाच्या माध्यमातून निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावीत. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. गावात सलोख्याचे वातावरण ठेवावे. विकास कामासाठी निधीची कमतरता कमी पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी कोऱ्हाळे खुर्द येथील महेश साळुंखे यांनी काठमांडू येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्विमिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्राम सोरटे, संचालिका प्रणिता खोमणे, उपसरपंच लक्ष्मण मदने, ग्रामसेवक रमेश पवार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.