-->
बारामती: लाटे येथील IPS विक्रम खलाटे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाडून विशेष पदक देऊन सन्मान

बारामती: लाटे येथील IPS विक्रम खलाटे यांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाडून विशेष पदक देऊन सन्मान

कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे येथील सिंघम आयपीएस अधिकारी विक्रम मुकुंदराव खलाटे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पदक देऊन पुरस्कृत करण्यात आले.

        अनेक महत्त्वपूर्ण व संवेदनशील प्रकरणे हाताळताना गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट तपास केल्याबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दुसऱ्यांदा गौरविण्यात आले आहे. सध्या त्यांना 'एनआयए'मध्ये पोलिस उपमहानिरीक्षक पदावर बढतीही मिळाली आहे.

                विक्रम खलाटे हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. जिल्हा परिषद शाळा लाटे येथे प्राथमिक शिक्षण तर 'रयत'च्या सिध्देश्वर विद्यालय कोऱ्हाळे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. यानंतर माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. पदवीनंतर २००८ मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून निवडले गेले. प्रशिक्षणानंतर नागालँडमधील मोकोकचुंग जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक म्हणून प्रभावी काम केले. या जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदा २०११ साली कुठलीही हिंसा न होता शांततेत निवडणुका पार पडल्या. या कामगिरीबद्दल अत्यंत मानाचे असे राज्यपालांचे सुवर्णपदक त्यांना मिळाले.

            या कामगिरीमुळे एनआयएच्या (नॅशनल इन्व्हीस्टीगेशन एजन्सी NIA) पश्चिम बंगाल विभागाचे प्रमुख म्हणून संधी मिळाली. वर्धमान जिल्ह्यामध्ये बाँबस्फोटात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. खलाटे यांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढत पस्तीस अतिरेकी जेरबंद केले. याचे धागेदोरे थेट जमात उल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेपर्यंत पोचले होते. यानंतर एनआयएच्या मुंबई कार्यालयाचे प्रमुख म्हणून निवड झाली. गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्याचे एनआयएचे NIA हे कार्यालय आहे. येथे काम करताना बनावट चलनाबद्दलची गोपनिय माहिती मिळवून त्याआधारे दहा राज्यात गुन्हे नोंदविले गेले.

याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडून २०१९ मध्ये 'साधारण असूचना पदक' मिळाले होते. याशिवाय अनेक संवेदनशील प्रकरणात त्यांनी वेगवान व गुणवत्तापूर्ण तपास केल्याबद्दल त्यांना नवी दिल्ली येथे त्यांना एनआयएच्या तेराव्या वर्धापनदिनानिमित्त अमित शहा यांच्या हस्ते दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक देऊन नुकतेच गौरविण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, निशिथ प्रामाणिक तसेच रॉ, आयबी, एनआयएचे अनेक अधिकारी उपस्थित होते.

जेट एअरवेजच्या मुंबई-दिल्ली या विमानात विमान अपहरणाची चिठ्ठी सापडली होती. त्यावरून  विक्रम खलाटे आरोपीपर्यंत पोचले. आरोपीस जन्मठेप आणि पाच कोटींचा दंड झाला होता. तसेच मुंबईत अंबानीच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरेलली गाडी आढळून आली होती. त्याप्रकरणी गाडीमालक मनसुख हिरेन याचा धक्कादायक मृत्यू समोर झाला होता. याप्रकरणी कुठल्याही दबाव न घेता खलाटे यांनी उत्कृष्ट तपास केला. सचिन वाझेसह काही जणांवर गुन्हे दाखल करून अटक केले होते. अत्यंत कमी वेळेत दहा हजार पानांचे आरोपपत्रही याप्रकरणी दाखल केले आहे.

पोलिस उपमहानिरीक्षकपदी बढती

विक्रम खलाटे हे मुंबई एनआयएमध्ये एसपी (पोलिस अधिक्षक) म्हणून कार्यरत होते. आता नुकतीच त्यांना त्यांना डीआयजी (पोलिस उपमहानिरीक्षक) म्हणून बढती मिळाली आहे. महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्याच्यास मुंबईमधील एनआयएच्या कार्यालयाचे ते प्रमुख बनले आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article