
जोगवडी ते ढोलेमळापर्यंत पुरंदर उपसा सिंचनच्या नव्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते संपन्न; सिरम इन्स्टिट्यूटकडून १ कोटी ३२ लाख रुपयांची मदत
Sunday, May 1, 2022
Edit
मोरगाव : मोरगाव ता. बारामती येथील जोगवडी ते ढोलेमळापर्यंत पुरंदर उपसा सिंचनची नव्याने पाईपलाईन टाकली जाणार आहे. या योजनेमुळे दोनशे शेतकऱ्यांना लाभ होणार असुन पाचशे हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने एक कोटी ३२ लाख रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचा शुभारंभ सोमेश्वर सह. साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप आज दि १ रोजी केला.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागासाठी पुरंदर उपसा सिंचन योजना वरदान ठरत आहे. या योजनेमुळे पश्चिम भागातील उजाड माळरानावरही उसाचे ताटवे पिकवण्यास सुरवात झाली आहे. मात्र तलाव व ओढ्यापर्यंत थेट बंदिस्त पाईपलाईन नसल्याने पुरंदर उपसा सिंचनचे पाणी मोरगाव नजीक वाड्यावस्त्यावरील शेतकऱ्यांना मोकळ्या शेतातून पाणी आणावे लागत असल्याने प्रत्यक्ष लाभ कमी व खर्च जास्त असे गणित होते. या भागातील अनेक दिवसांची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुर्ण केली. यासाठी आदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने सीएसआर फंडातून १.३२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या कामाचा शुभारंभ आज दि १ रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर होते. या कार्यक्रम प्रसंगी पुणे महानगरपालिका उपायुक्त संदीप कदम, मोरगावचे सरपंच निलेश केदारी, माजी सरपंच पोपट तावरे, उपसरपंच संदीप नेवसे, अनिल ढोले, संजय तावरे, बारामती तालुका राष्ट्रवादी पदवीधरचे अध्यक्ष शुभम तावरे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अक्षय तावरे, अविनाश ढोले व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
मोरगावचे मुळ रहीवाशी असलेले पुणे महानगरपालिका उपायुक्त संदीप कदम यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. मोरगाव परीसरातील ढोलेमळा, पाटील बुवाचामळा, चोपणवस्ती, तावरेवस्ती, हनुमाननगर, सोनारशेत येथील दोनशे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर येथील पाचशे हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. यामुळे परीसरातील शेतकरी कुटुंबीयांचे जीवनमान उंचवणार असल्याने शेतकरी आनंदीत आहेत