
वडगांव निंबाळकर येथून पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह चार दिवसानंतर सापडला
Sunday, October 16, 2022
Edit
कोऱ्हाळे बु: ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वडगाव निंबाळकर येथील नरेश म्हस्कू साळवे (वय ५५) यांचा मृतदेह अखेर रविवारी (दि. १६) सकाळी सापडला. वडगावातील ओढा पात्रापासून एक किमी अंतरावर हा मृतदेह शोधण्यात यश आले. गेल्या चार दिवसांपासून साळवे यांचा शोध सुरु होता.
गुरुवारी (दि. १३) माळीवस्तीकडून बाजारतळाकडे साळवे हे निघाले होते. यावेळी बाजारतळाजवळील पुलावरून पाणी वाहत होते. रोजचा रस्ता असल्याने सहज पलिकडे जावू असे त्यांना वाटले. परंतु यावेळी पुलावरून सुमारे तीन हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. त्यामुळे पाण्याच्या वेगाने ते घसरून पुलावरून खाली पडत वाहत गेले. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा व्हिडीओ केला होता.
ग्रामस्थांनी तात्काळ ही बाब वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला कळवली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी कर्मचाऱयांसह धाव घेत शोध सुरु केला. ग्रामस्थांनीही शोध कार्य हाती घेतले. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्य़क्ष संभाजी होळकर, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, पंचायत समिती सदस्य प्रदीप धापटे आदींनी घटनास्थळी भेट दिली होती.