
Gram Panchayat Election: राज्यात गावकारभाऱ्यांच्या निवडीसाठी आज मतदान; अनेकांचे जीव टांगणीला
Sunday, December 18, 2022
Edit
गावाचा कारभार हाकणाऱ्या गावकारभऱ्यांच्या निवडीसाठी आज (दि. १८) रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान होत आहे. यावेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून होत असल्याने चुरस वाढली आहे. यावेळी तरुणांचा ग्रामपंचायत निवडणुकीत अधिक पुढाकार आहे. बहुतेक ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत.
राज्यातील ३४ जिल्ह्यांत ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यातील साधारण पन्नासपेक्षा अधिक गावांत बिनविरोध निवडणूका झाल्या आहेत. काही दिग्गज नेत्यांच्या गावांतील निवडणूका होत असल्याने तेथील वातावरण तापले आहे.
एका-एका मतदारांकडे पुन्हा, पुन्हा चाकरा मारल्या गेल्या. आता पंधरा दिवसाच्या प्रचारानंतर नेमका कोण जिंकतो, याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे. दहा वर्षांपूर्वी गावपातळीवरील राजकारणात वरिष्ठ नेते फारसे लक्ष घालत नव्हते. आता मात्र पक्षीय लोकांनी थेट सहभाग घेतला असल्याने उघडपणे राजकीय पॅनेल आहेत. बहुतांश गावांत तरुणांनी जुन्या जाणत्यांसमोर आव्हाने उभी केली आहेत. त्यामुळे ‘तरुण’ विरुद्ध ‘जुने जाणते’ असे चित्र आहे. मंगळवारी (ता. २०) निकाल जाहीर होऊन चित्र स्पष्ट होणार आहे.