
ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; बारामती तालुक्यातील चोपडज येथील घटना
Tuesday, January 3, 2023
Edit
बारामती- ट्रॅक्टरने धडक दिल्याने मोटरसायकल वर मागे बसलेला पाच वर्षीय बालक मोटरसायकलवरून खाली पडत ट्रॅक्टरच्या चाकाखाली गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी 10.45वा सुमारास चोपडज वाकी रस्त्यावर जगताप वस्ती येथे ही घटना घडली आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धर्मेंद्र जीवधर काळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक रोहन उर्फ दत्तात्रय रवींद्र साळवे रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला.
फिर्यादी याचा भाऊ चेतन हा त्यांची पत्नी प्रतिक्षा व मुलगा शौर्य यासह मोटर सायकल वरून एमएच १४ क्यू ३३७९ वरून कानावडवाडी येथून वाकी-चोपडज रस्त्याने चोपडजकडे जात होते. जगताप वस्तीजवळ चोपडज बाजूकडून येणाऱ्या ट्रॅक्टरने चुकीच्या दिशेने येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात मोटरसायकल वर बसलेला मुलगा हा गाडीवरून खाली पडला. ट्रॅक्टचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.या दुर्दैवी अपघातानंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.