
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये नेमणुकीस पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे यांच्यावर कोयत्याने हल्ला
शिरूरच्या जोशीवाडी, गवळी वीट भट्टी जवळ २८ मार्च रोजी संध्याकाळी ०७:४५ वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. हा हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, शिरुर पोलिस त्यांचा शोध घेत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे सतरा कमानीकडे गवळी वीटभट्टीच्या जवळ पायी चालत जात होते. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती मोटर सायकल ढकलत रोडने चालताना दिसले. त्यांनी नागरे यांना विचारले की पेट्रोल पंप कुठे आहे ? पेट्रोल टाकायचे आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की, शिरूर गावामध्ये व हायवेवर पण पेट्रोल पंप आहे. त्यावेळी पोलिसांनी त्यांना विचारले की, तुम्ही मोटर सायकल ढकलत का चालले होता? त्यावेळी त्यांनी तुम्ही कोण आहात? असे विचारले असता, त्यांनी त्यांना मी पोलिस आहे असे सांगितले. त्यावेळी त्यांनी सदर पोलिसावर कोयत्या सारख्या धारदार हत्याराने वार करून पळून गेले आहेत. सदर जखमी पोलिस यांच्यावर सध्या शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या मानेवर पाठीमागील बाजूस वार झालेने खोलवर जखम झालेली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहे.
कोणत्या कारणास्तव पोलिसावर या अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला याचा कोडे अद्याप गुलदस्त्यात आहे. घटनास्थळावरून आरोपी पळून गेले आहेत. शिरूर पोलिस स्टेशनपासून अवघ्या १ किलोमीटरवर पोलिसावरच गुंडाकडून हल्ला होणे फारच निंदणीय आहे.