
वडगाव, साखरवाडीकरांनो मासे खाताय...सावधान... केमिकलने मृत्यू झालेले मासे तर नाहीत ना....
Sunday, April 2, 2023
Edit
सोमेश्वर नगर - हेमंत गडकरी
आज वडगाव निंबाळकर व साखरवाडी गावाचा आठवडी बाजार. बाजारात जर तुम्हाला स्वस्त दरात मासे मिळत असतील तर सावधान असे मासे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकतात. त्यामुळे सध्या मासे खाण्याचे टाळा.
होळ येथील ढगाई देवीच्या मंदिरामागे असलेल्या एका ओढ्यातून नीरा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रित दूषित पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर काळा तवंग आला असून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. या रसायन मिश्रित पाण्यामुळे शेकडो टन मासे तडफडून मृत्यू पावले आहेत. काही मासे दूषित पाण्यापासून बंधाऱ्या पलीकडे असणाऱ्या शुध्द पाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिक लोक असे मासे पकडून त्याची विक्री करत आहेत. मृत माशांचा नदीपात्रात अक्षरशः खच पडला आहे. वडगाव निंबाळकर व साखरवाडी चा आठवडी बाजार आज असल्याने याचा फायदा उचलत स्थानिक लोकांनी पिक अप, गाड्या, पोती, कॅरेट भरून मृत मासे वडगाव निंबाळकर व साखरवाडी च्या दिशेने विक्रीसाठी नेले आहेत. त्यामुळे तुम्हाला अतिशय स्वस्त दरात मासे मिळतील. परंतु हे मासे खाल्ल्याने तुम्ही आजारांना निमंत्रण देऊ शकता. त्यामुळे अजून काही दिवस तरी मासे खाण्याचे टाळा.