कोऱ्हाळे बुद्रुकच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आबा पडळकर
Saturday, June 24, 2023
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुकच्या उपसरपंचपदी आबा पडळकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या सूचनेनुसार ही निवड झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सतीश खोमणे यांनी पंधरा पैकी आठ जागा जिंकत सत्ता मिळवली होती तर सोमेश्वर कारखान्याचे संचालक सुनील भगत यांना केवळ चार जागा जिंकता आल्या. सोमेश्वर कारखान्याचे संचालक लालासाहेब माळशिकारे यांनी तीन जागा उभ्या करत तीनही जागा जिंकल्या होत्या.
त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव रवींद्र खोमणे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडली तर उपसरपंच म्हणून लता नलवडे यांची निवड झाली. नलवडे यांनी विहित कालावधीत उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिव्याभारती खोमणे यांना उपसरपंच पदी काम करण्याची संधी मिळाली त्यांनीही नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला.
उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच रवींद्र खोमणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी आबा पडळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी पडळकर यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी हनुमंत जगदाळे, सुनिता खोमणे, लता नलवडे, राजेंद्र पवार आशाबी सय्यद दिव्याभारती खोमणे, माजी उपसरपंच अंकुश चव्हाण, राहुल भगत, सचिन खोमणे, बिराप्पा ठोंबरे, मनोज कोकणे, अमर माळशिकारे, मारुती माळशिकारे उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना उपसरपंच आबा पडळकर म्हणाले की जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवणार आहे.