नवभारत साक्षरता सर्वेक्षणावर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा बहिष्कार
Wednesday, August 23, 2023
Edit
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वेक्षणावर बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने बहिष्कार घातल्यानंतर आता पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने बहिष्कार घातला आहे.
देशातील अशिक्षितांची माहिती घेण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन माहिती घेण्याचे तोंडी आदेश त्या त्या भागातील गटशिक्षणाधिकारी यांनी दिले होते. मात्र दोनच दिवसांपूर्वी बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाने या अशैक्षणिक कामावर बहिष्कार घालत असल्याचे निवेदन दिले होते.
यानंतर आता पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघानेही या सर्वेक्षणावर बहिष्कार घालत असल्याचे पत्र राज्याची शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहे. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड यांनी हे निवेदन दिले आहे.
सध्या जिल्ह्यातील सर्वच शाळात कर्मचारी कमी आहेत. उपलब्ध कर्मचाऱ्यांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिवाय शालेय घटक चाचणी परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, शासकीय चित्रकला परीक्षा, अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रणालीत नोंद करणे अशी अनेक शैक्षणिक कामे व अनेक उपक्रम राबवावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षकांना गुणवत्तापूर्ण अध्यापन करताना अडथळे येतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांना नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाचे काम देऊ नये अशी विनंती पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी केली आहे.