-->
औद्योगिक कामगारांना मतदान करण्यासाठी वेळेची सवलत द्यावी - वैभव नावडकर

औद्योगिक कामगारांना मतदान करण्यासाठी वेळेची सवलत द्यावी - वैभव नावडकर

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार दि २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून  बारामती एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील सर्व मोठ्या कंपन्या व लघुउद्योगांनी त्यांव्या कामगारांना मतदान करता यावे यासाठी वेळेची सवलत द्यावी व ते मतदानापासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी असे निर्देश बारामती विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर व तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिले. बारामती औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख उद्योग प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष  धनंजय जामदार, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता विजय पेटकर, सचिव अनंत अवचट, उद्योजक नितीन आटोळे, संदीप जगताप, राजाराम सातपुते, दिलीप भापकर तसेच पियाजिओचे किरण चौधरी, डायनामिक्सचे अमोल माने, जीटीएनचे संतोष कणसे, किर्लोस्करचे अतुल कोटांगले, फेरेरोचे विक्रम वाघमोडे, भारत फोर्जचे अमोल फाळके या प्रमुख कंपन्यांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

वैभव नावडकर म्हणाले राज्य शासनाने परिपत्रक काढून मतदानास पात्र असणाऱ्या कामगारांना मतदान करता यावे यासाठी वेळेची सवलत देणे अनिवार्य केले असून या आदेशाची सर्व उद्योग आस्थापनांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

अध्यक्ष धनंजय जामदार म्हणाले बारामती औद्योगिक क्षेत्रातील सर्व मोठ्या कंपन्या व लघुउद्योग कामगारांना मतदान करायला जाण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत वेळेची सवलत अथवा सुट्टी देत असतात. याही वेळेस मतदानापासुन कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल. कामगारांचे जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी  बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन उद्योजकांमध्ये जनजागृती करत असून यासाठी येथील मोठ्या कंपन्या मोलाचे सहकार्य करत आहेत अशी माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी बैठकीत दिली.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article