कोऱ्हाळे बुद्रुक येथील कठीण पुलानजीक चार चाकी व ट्रकचा भीषण अपघात: चार जण गंभीर जखमी
Sunday, January 12, 2025
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक कठीण पूल येथील तुकाई नगर जवळ चार चाकी व ट्रक चा भीषण अपघात झाला असून यामध्ये कार चालक, महिला, बालके गंभीर जखमी झाले आहेत.
वालचंदनगर परिसरातील एक कुटुंब आपल्या एक्स यू व्ही कार मधून मांढरदेवी या ठिकाणी काळूबाईच्या दर्शनासाठी बारामती बाजूकडून निरेकडे निघाले होते. तर नीरा बाजूकडून बारामती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट चा मालवाहतूक करणारा मालट्रक बारामतीच्या दिशेने निघाला होता. हॉटेल रेहान नजीक ट्रकने ( एम एच ४२ टी ९५४५ ) चुकीच्या बाजूला जात एक्स यू व्ही कारला ( एम एच १४ इ यू ७३५३ ) समोरासमोर जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती कळताच वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी बारामतीला पाठवले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. वडगाव निंबाळकरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात महिला व बालके गंभीर जखमी झाल्याने लोकांनी हळहळ व्यक्त केली.
………….
श्रीनाथ ट्रान्सपोर्ट वर कारवाई करावी- नागरिकांची मागणी
बारामती येथील श्रीनाथ ट्रान्सपोर्ट बद्दल अनेकांच्या तक्रारी आहेत. या ट्रान्सपोर्टच्या गाड्या नेहमीच भरधाव वेगाने असतात. शिवाय काही अपघात घडला की आर्थिक उलाढाल करून प्रकरण मिटवण्यात येते अशी चर्चा आहे. त्यामुळे मालक कितीही गब्बर असला तरी कोणताही हस्तक्षेप ना होता कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे.